सुनील जगताप
पुणे: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापने वरील निवडसूची २०२५-२६ नुसार प्रशासकीय निर्णय घेत जून महिन्यात सहा अधिकाऱ्यांना तर, आता उर्वरित तीन तालुका क्रीडा अधिकारी यांनाही पदोन्नती दिली आहे.
क्रीडा विभागामध्ये गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना ‘जिल्हा क्रीडा अधिकारी गट-अ’ या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमध्ये फलटण येथील तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया भालचंद्र गाढवे यांची धाराशिव येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून श्रीगोंदा येथील तालुका क्रीडा अधिकारी दिलीप पर्वतराव दिघे यांची जळगाव येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून, तर अंबड येथील तालुका क्रीडा अधिकारी अरविंद मारुतीराव विघागर यांची बीड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून तात्पुरती पदस्थापना केली आहे.
या पदोन्नती पूर्णपणे ज्येष्ठता, गुणवत्ता आणि विविध न्यायालयांत प्रलंबित असलेल्या याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्यामुळे या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियमितपणाचा कोणताही हक्क मिळणार नाही. शासनाच्या आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी पदोन्नती आदेश निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आपल्या नवीन पदावर रुजू होणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत पदभार न स्वीकारल्यास त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही शासनाकडून देण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलामुळे राज्यातील क्रीडा प्रशासनाला अधिक गतिशीलता व ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या तीन अधिकाऱ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेली असली तरी राज्यातील काही जिल्ह्यांना अद्यापही जिल्हा क्रीडा अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे ही पदे कधी भरणार आहेत आणि त्या जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा कलांना कधी वाव मिळणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
क्रीडा शासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित नंदुरबार, अहिल्यानगर यांसह अजून काही ठिकाणच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदाच्या जागा शिल्लक आहेत. परंतु, त्या जागेवरही लवकरच नियुक्त्या करण्यात येतील.सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय