पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) यंदा नियोजित वेळापत्रकानुसार जून-जुलै महिन्यातच होणार आहे. तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) प्रमाणेच सेट परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ पातळीवर विचार सुरू आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.
विद्यापीठात आयोजित
कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोसावी यांनी सेट व पेट (पीएच.डी. प्रवेश परीक्षा) याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सरकारी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्र होण्यासाठी सेट परीक्षा अनिवार्य मानली जाते.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ही परीक्षा घेण्याची जबाबदारी पुणे विद्यापीठावर सोपविण्यात आली आहे. राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती होण्याची शक्यता असल्याने सेट परीक्षेकडे उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सेट विभागाकडून आवश्यक नियोजन व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. गोसावी म्हणाले, “सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी तसेच संशोधकांना रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरण्यासाठी नेट परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. जून आणि डिसेंबर या दोन सत्रांप्रमाणेच सेट परीक्षाही दोन वेळा घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील.”
पीएच.डी. प्रवेश परीक्षेचीही तयारी सुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. सेट परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लगेचच पेट परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी वेळेवर आणि नियोजनबद्ध तयारी करावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले आहे.