Schools Smart Attendance Pudhari
पुणे

Maharashtra Schools Smart Attendance: १५ ऑक्टोबरपासून शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती अनिवार्य; मुख्याध्यापकांवर जबाबदारी

पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘स्मार्ट उपस्थिती’ प्रणाली; ठरावीक वेळेत नोंद करणे बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार येत्या १५ ऑक्टोबरपासून ‘स्मार्ट उपस्थिती’द्वारे सर्व शाळांनी सर्व शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवावी. शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आल्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

सिंह यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार, समग्र शिक्षा, पीएम पोषण, स्टार्स, पी. एम. श्री अंतर्गत उपक्रमांचे संनियंत्रण, तसेच राष्ट्रीय विद्या समिक्षा केंद्राद्वारा तयार केलेल्या फ्रेमवर्क अंतर्गत उपस्थिती, मूल्यमापन, अधिस्वीकृती, प्रशासन, अनुकूलनक्षम अध्ययन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे ट्रॅकिंग करण्यासाठी राज्याचे विद्या समीक्षा केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामार्फत विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती चालू शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन नोंदविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याचे यापूर्वीच सुरू केले आहे.

आता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती मुख्याध्यापकांनी नोंदवावी व मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीत प्रभारी मुख्याध्यापकांनी उपस्थिती नोंदविणे अनिवार्य असेल. ज्या शाळा शालार्थ पोर्टलमध्ये आहेत, अशा सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांनी स्विफ्ट चाट या ॲप्लिकेशनमध्ये उपस्थिती नोंदविताना मुख्याध्यापकांनी शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा. तसेच, शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

ज्या शाळा शालार्थ पोर्टलमध्ये नाहीत, अशा सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी यू- डायस+पोर्टलमधील १० अंकी नॅशनल टिचर कोड व यू-डायस+पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकाचा वापर करावा. ज्या मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापकांना उपस्थिती नोंदविण्यासाठी शिक्षकांची यादी दिसत नसेल, तर त्यांनी शालार्थ पोर्टल व यु-डायस+ पोर्टलवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नोंद अद्ययावत करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर शिक्षकांची यादी पुढील काही दिवसांत दिसेल. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७ ते दु. १२, तर अन्य शाळांसाठी सकाळी १० ते सायं. ५ दरम्यान उपस्थितीची नोंद करावी. रात्रशाळांना आपली उपस्थिती रात्री ९ पर्यंत नोंदविता येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागातील अधिकारी आढावा घेणार

उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्रॅमर याकामी त्यांना मदत करतील. शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT