RTE Admission  Pudhari
पुणे

Maharashtra RTE Admission: RTE प्रवेशातील निवड यादी पूर्ण; आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी

राज्यात 79 हजारांहून अधिक प्रवेश निश्चित; पुणे जिल्हा पुन्हा अव्वल, प्रतीक्षा यादीचे वेळापत्रक लवकरच जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या 25 टक्के प्रवेशप्रक्रियेत निवड यादीतील 79 हजार 465 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित रिक्त जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असून, त्यासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे लवकरच जाहीर केले जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालना लयातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यातील 8 हजार 701 शाळांतील 1 लाख 14 हजार 826 जागांसाठी 2 लाख 89 हजार 286 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या सोडतीच्या माध्यमातून निवड यादीत 1 लाख 5 हजार 811 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.

त्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत 8 मे रोजी संपुष्टात आली. दिलेल्या मुदतीत 79 हजार 465 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीत 86 हजार 34 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

‌‘आरटीई‌’चे सर्वाधिक प्रवेश पुण्यात

‌‘आरटीई‌’चे सर्वाधिक 13 हजार 874 प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहेत, तर सर्वांत कमी प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ 126 प्रवेश झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात 7 हजार 703, नागपूर जिल्ह्यात 4 हजार 645 , नाशिक जिल्ह्यात 3 हजार 934 , छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3 हजार 398 , मुंबईमध्ये 3 हजार 375, रायगड जिल्ह्यात 3 हजार 128, अहिल्यानगर जिल्ह्यात 2 हजार 817, कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 189, बुलढाणा जिल्ह्यात 2 हजार 290 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 512, गडचिरोली जिल्ह्यात 381, तर गोंदिया 787 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT