Maharashtra Resident Doctors Strike
पुणे : राज्यात निवासी डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला संप आता अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. काल रात्री १२ वाजेपासून राज्यभरात सुरू झालेल्या या संपामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून, उद्यापासून आपत्कालीन सेवा आणि ओपीडी बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
या आंदोलनात राज्यातील सुमारे १३ हजार वैद्यकीय निवासी डॉक्टर्स, इंटर्न्स, रेसिडेंट डॉक्टर्स आणि सीनियर रेसिडेंट्स पूर्णपणे सहभागी झाले आहेत. यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे.
"डॉक्टरांनी पुकारलेल्या या आंदोलनानंतरही सरकार आमच्याशी संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाही. प्रशासनाकडून आम्हाला अजूनही चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. सरकारच्या या उदासीन यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे डॉ अथर्व शिंदे यांनी सांगितले.
आज राज्यभरात सर्व सामान्य ओपीडी बंद ठेवून डॉक्टरांनी निषेध नोंदवला. मात्र, प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्याने उद्यापासून हे आंदोलन अधिक उग्र केले जाणार आहे. त्यानुसार, उद्यापासून अत्यावश्यक/आणीबाणी सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या संपामध्ये एमबीबीएस आणि ॲलोपॅथीचे सर्व निवासी डॉक्टर्स सहभागी झाले असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.