E-Search Service Pudhari
पुणे

Maharashtra E-Search Property Service: नोंदणी विभागाची ई-सर्च सेवा पूर्ववत; आयपी मर्यादा 150 पर्यंत वाढ

संकेतस्थळ दुरुस्तीनंतर वेग वाढला; मिळकतींचा शोध अधिक सुलभ झाला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नोंदणी विभागाची ठप्प झालेली ई-सर्च सुविधा दुरुस्ती आणि सुधारणेनंतर पूर्ववत करण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. या सुधारणेमुळे प्रत्येकाला दररोज किमान चार ते पाच मिळकतींचा शोध घेणे आता शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात नोंदणी विभागाचे हे संकेतस्थळ ठप्प झाल्याचे वृत्त दै. ‌‘पुढारी‌’ने दिले होते. त्याची दखल घेत या विभागाने या संकेतस्थळाच्या सॉफ्टवेअरची दुरुस्ती करून त्यात सुधारणा केल्या. त्यामुळे मिळकतींचा शोध घेण्यासाठीची ही सुविधा आता पूर्ववत सुरू झाली आहे.

एकाच आयपी ॲड्रेसवरून अनेकवेळा हे संकेतस्थळ वापरण्याचे प्रयत्न होत असल्याने त्यावर अतिरिक्त ताण येऊन त्याचा वेग मंदावत होता. त्यामुळे काही वेळा ते ठप्प होत असे, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यात दुरुस्ती करण्याबरोबरच एकाच आयपी ॲड्रेसवरून त्याच्या वापरावर निर्बंध घालण्याची सुधारणाही त्यात करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक (आयटी) अभयसिंह मोहिते यांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना दिली. मिळकतींचा शोध घेण्यासाठी एका आयपी ॲड्रेसवरून दिवसाकाठी फक्त दहा वेळाच या संकेतस्थळाचा वापर करता येईल, असा बदल नोंदणी विभागाने सुरुवातीला केला होता.

पण हा बदल मिळकतींच्या शोध अहवालासाठी पुरेसा नसल्याची बाब ॲड. कैलास थोरात आणि ॲड. निलेश टुले यांनी मोहिते यांच्या निदर्शनास आणून दिली. एका मिळकतीचा शोध अहवाल देण्यासाठी 30 वर्षातील फेरफारांची माहितीची गरज असते. प्रत्येक वर्षातील नोंदीसाठी किमान एकदा तरी संकेतस्थळावर जावे लागते, हे विचारात घेता 10 वेळा संकेतस्थळ वापराची मर्यादा खूपच कमी आहे, हे त्यांनी पटवून दिले. त्यामुळे मोहिते यांनी ही मर्यादा आता दहावरून दीडशेपर्यंत वाढवली आहे.

वेग वाढला

दुरुस्तीमुळे या संकेतस्थळाच्या वेगात चांगली वाढ झाली असून, एका आयपीवरून दीडशेवेळा ॲक्सेस मिळू लागल्याने दिवसाकाठी किमान चार तरी मिळकतींचा शोध घेणे शक्य झाले आहे, असे ॲड. विलास जाधव यांनी सांगितले.

नोंदणी विभागाच्या या संकेतस्थळावर मोफत सुविधेप्रमाणेच सशुल्क सर्च सुविधाही उपलब्ध आहे. किमान तीनशे रुपये शुल्क भरून येथे मिळकतींची माहिती उपलब्ध होते. तथापि, या सेवेद्वारे घोषणापत्र, संमतीपत्र, चूक दुरुस्ती पत्रांबाबतचे सूची दोन उतारे उपलब्ध होत नाहीत. ते मिळविण्यासाठी पुन्हा मोफत सुविधेचीच मदत घ्यावी लागते.
ॲड. कैलास थोरात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT