राजगुरुनगर: जुन्नर, आबेगाव आणि खेड तालुक्यात ऐन हिवाळ्यात आठ दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने काढणीला आलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा भात जमीनदोस्त झाला आहे. भातखाचरांमध्ये पाणी साठल्याने भाताला मोड येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. (Latest Pune News)
पट्टा जुन्नर, अआंबेगाव आणि खेड या तालुक्यांतील पश्चिम भातपिकाचे आगर म्हणून ओळखले जाते. यंदा सुरुवातीपासूनच खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातरोपेच टाकता आली नाहीत. त्यानंतर थोडा बरा पाऊस झाल्याने काही भागांत भाताचे पीक जोमात होते.
आता नेमक्या भातकाढणीच्या वेळी आठ दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भातखावरांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा भात जमीनदोस्त झाला आहे. तयार झालेला भात पाण्यात आडवा झाल्याने मोड येण्याची शक्यता आहे. यामुळेच सध्या जुन्नर, आंबेगाव आणि खेडमधील भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
आमच्या भागात खरीप हंगामात केवळ भातपीक हे एकमेव पीक घेतले जाते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी वर्षभरासाठी एकमेव भातपिकाचा आधार असतो. सध्या भातकाढणीची वेळ असून, आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच आमच्यासारखे जिरायती भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी.रघुनाथ सावंत, विर्हाम, भात उत्पादक शेतकरी