पुणे: ऑनलाइन माहिती भरणे, विविध शासकीय उपक्रमांची अंमलबजावणी आणि सातत्याने येणाऱ्या प्रशासकीय आदेशांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून अध्यापनात अडथळा निर्माण करणारी ऑनलाइन कामे न करण्यासह प्रशासनिक व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याची भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे.
पुण्यातील शिक्षक भवन येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाची दिशा निश्चित केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा ऑनलाइन माहिती संकलन, विविध योजनांचे अहवाल आणि प्रशासकीय कामांमध्ये अधिक वेळ खर्च करावा लागत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली. प्रशासनाकडून व्हॉट्सॲप ग्रुपवर रात्री-अपरात्रीही सूचना आणि आदेश पाठविले जात असल्याने शिक्षकांवरील मानसिक ताण वाढत आहे. परिणामी, वर्गातील अध्यापनाकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट केली असली, तरी प्रत्यक्षात जिल्हास्तरावर विविध कामांची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली जात असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय संचमान्यता धोरण, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भातील शासनाची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबतची धोरणे, शाळांमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवरही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
विविध संघटनांनी स्वतंत्रपणे आंदोलने करूनही शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता राज्यभरातील संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून असहकाराची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.