पाडापाडीची भाषा आम्ही करत नाही; जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला 
पुणे

Maharashtra Politics: पाडापाडीची भाषा आम्ही करत नाही; जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

Pune Politics: निवडणुकांमध्ये हार-जित होत असते. कोणाला निवडून आणायचे कोणाला पाडायचे हे त्या त्या मतदारसंघातील जनता ठरवते.

पुढारी वृत्तसेवा

Pune Political News: निवडणुकांमध्ये हार-जित होत असते. कोणाला निवडून आणायचे कोणाला पाडायचे हे त्या त्या मतदारसंघातील जनता ठरवते. त्यामुळे आम्ही इतरांसारखी याला पाडतो, त्याला पाडतो, हा कसा निवडून येतो ते बघतो, अशी भाषा करत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 45 उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी अजित पवार यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर टोला लगावला.

पुढे ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना बारामती मतदारसंघातून मिळालेले मतदान पाहता युगेंद्र पवार यांना बराच वाव आहे. युगेंद्र पवार हे सालस, शिकलेले, सरळ अतिशय जबाबदार पद्धतीने वागणारे आहेत. बारामतीत मतदारांना नवा चेहरा, नवा उमेदवार हवा होता. तशी त्यांची मागणी होती. त्यानुसार युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तसेच, महाविकास आघाडीमधील 255 जागांचा प्रश्न सुटला आहे. उर्वरित जागासंदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येईल. एकत्रित बसून महाराष्ट्रला आवश्यक असणारे निर्णय घेण्यात येईल. महाविकास आघाडीत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे सूत्र आहे. मुख्यमंत्री पदाबाबतची घोषणा करण्याची गरज नाही. त्यावेळची परिस्थितीनुसार सूत्र ठरविण्यात येईल.

निष्ठावंत बंडखोरी करणार नाही. शरद पवार यांनी दिलेला निर्णय शिरसावंद्य समजून काम करतील. निष्ठावंत शरद पवार यांच्या पाठीमागे राहतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीबाबत लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. यामुळे जागोजागी लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सांगोल्याची जागा शेकापला सुटावी, अशी आमची इच्छा आहे. तसेच सध्या आम्ही तसे प्रश्न करत आहे. शेकापचे नेते डॉ. बाळसाहेब देशमुख यांचे चांगले काम आहे, तिथे त्यांची ताकद आहे. शिवसेना (ठाकरे गट) विद्यमान आमदार असल्यामुळे दोन्ही पक्षांची बोलणी सुरू आहे. एक-दोन दिवसात प्रश्न सुटेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपने ज्यांच्यावर भ-ष्ट्राचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेतले याचा फटका बसणार आहे. नबाव मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले. आता महायुतीकडून त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात येत आहे. नवाब मलिक यांची लाज वाटत असल्याने त्यांना अपक्ष म्हणून लढवायला सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे मलिक यांना लढायला सांगत असेल, तर भाजप किती खोटा आहे लक्षात येत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT