Pune Political News: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस उलटल्यानंतरही पुण्यातील आठपैकी सात जागांवरील निवडणूक लढतीचे चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. केवळ हडपसरच्या जागेवर दोन्ही राष्ट्रवादीसह मनसेने उमेदवार जाहीर केल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे.
शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. मात्र, यापैकी केवळ हडपसर मतदारसंघाचे चित्र आता जवळपास पूर्ण स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी पवार गटाकडून प्रशांत जगताप आणि मनसेकडून साईनाथ बाबर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने या ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उर्वरित सात मतदारसंघांत भाजपने तीन जागांवरील, तर मनसेने दोन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पर्वती मतदारसंघात भाजपकडून आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीत ही जागा नक्की कोणाकडे जाणार आणि उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तर, शिवाजीनगरमध्ये आमदार सिध्दार्थ शिरोळे यांची उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांच्याविरोधातील उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेला नाही. कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार, याचे चित्र अस्पष्टच आहे.
तर, वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी पवार गटाकडून बापूसाहेब पठारे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, या ठिकाणी महायुती नक्की कोणाला संधी देणार, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. खडकवासला मतदारसंघात मनसेकडून मयूरेश वांजळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
मात्र, भाजप आणि मनसे यापैकी कोणी उमेदवार जाहीर केलेला नाही. तर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्येही कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे येथील चित्र जास्तच अस्पष्ट आहे.