पुणे: पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली होती. परंतु, आता पुन्हा एकदा पेसा क्षेत्रातील शाळांमधील उपलब्ध जागांपैकी तब्बल 80 टक्के जागांवर शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत.
सिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ग््रााम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीसाठी वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती.
सन 2023 मध्ये ग््राामविकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील अन्य प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्यांकडून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. तरी अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीस काही कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट)-2022 दिलेल्या पेसा उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच, या उमेदवारांना पवित्र पोर्टलमार्फत सर्वसाधारण भरतीप्रक्रियेत गुणवत्तेनुसार अन्य रिक्त पदांवर निवडीचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता. त्यानुसार टेट-2022 चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांची माहिती निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीच्या कार्यवाहीस सामान्य प्रशासन विभाग यांचेकडून स्थगिती देण्यात आली होती.
आता गुणवत्तेनुसार आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नियुक्तीस पात्र असलेले परंतु, अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसले, तरी स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असल्यास त्यांचा निवडीसाठी विचार करण्यात यावा. यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.
त्याप्रमाणे आपल्या स्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-2022 नुसार गुणवत्तेनुसार एसटी पेसा क्षेत्रासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करूनच नियुक्ती देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. त्यानंतरही रिक्त राहणारी पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाही अनुसरण्यात यावी, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.