पुणे

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार रंगणार १० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, माजी खासदार अशोक मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.

रामदास तडस म्हणाले, "अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी'चे हे ६५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करत स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. ४७ तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे."

मुरलीधर मोहोळ म्हणाले, "स्पर्धेचे उद्घाटन १० जानेवारीला होणार आहे. उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.

"कै. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे आली, ही आनंदाची बाब आहे. 'महाराष्ट्र केसरी'ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

अशोक मोहोळ म्हणाले, "मामासाहेब मोहोळ यांच्या गावात मोहोळ कुटुंबीय ही स्पर्धा भरवत आहेत, ही आनंदाची बाब आह. तसेच गेली ३८ वर्षे 'महाराष्ट्र केसरी'ची गदा देण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. जो 'महाराष्ट्र केसरी' ठरतो, त्याच्या हातात मानाची गदा देताना समाधान वाटते."

विलास कथुरे म्हणाले, "विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. ९०० कुस्तीगीर, ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी सहभागी होणार आहेत."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT