पुणे: राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत १ लाख १२ हजार २४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी ९१ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असून, ८७ हजार ९७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहे. सध्या प्रवेश प्रक्रियेतील अर्जनोंदणी, अर्ज भरणे, शुल्क भरणे, अर्जनिश्चिती आणि पहिल्या फेरीसाठी पर्याय अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरण्याचे टप्पे सुरू आहेत.
यंदा राज्यातील सर्व शासकीय आणि मान्यताप्राप्त खासगी आयटीआय संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
प्रवेश सूचना प्रसिद्ध करताना संचालनालयाने विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्ज खात्याचा पासवर्ड गोपनीय ठेवण्याचा आणि सर्व माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज निश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. प्रथम प्रवेश फेरीनंतरच्या पुढील प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक २५ जून रोजी जाहीर होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहे आयटीआय वेळापत्रक
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती व शुल्क भरणे : २१ जून (सायं. ५ वाजेपर्यंत)
अर्जनिश्चिती : २१ मे ते २२ जून (सायं. ५ वाजेपर्यंत)
पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे : १ जून ते २३ जून (सायं. ५ वाजेपर्यंत)
प्राथमिक गुणवत्ता यादी : २५ जून (सायं. ५ वाजता)
हरकती नोंदविणे व माहिती दुरुस्ती : २६ ते २७ जून (सायं. ५ वाजेपर्यंत)
अंतिम गुणवत्ता यादी : २८ जून २०२६ (सायं. ५ वाजता)