पुणे: राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. विशेषत: वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना यामुळे अवकाळी पाऊस वाढलेला आहे. दरम्यान, हा पाऊस 22 मेपर्यंत सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील पश्चिम भागापासून ते आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे. तसेच अरबी समुद्राच्या मध्यपूर्व आणि ईशान्य भागापासून ते दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळेच राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. (Latest Pune News)
पोषक वातावरणामुळे ‘मान्सून’ची वाटचाल वेगाने
अंदमान निकोबार बेटांवर सरासरीच्या दहा दिवस अगोदरच दाखल झालेल्या मान्सूनची पोषक वातावरणामुळे पुढील वाटचाल आणखी सुकर झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग व्यापणार आहेच, याशिवाय दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग व्यापणार आहे.
मान्सूनची पोषक वातावरणामुळे पुढील वाटचाल वेगाने सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रीय स्थिती, आंध्र प्रदेशच्या उत्तर भागातील किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागापर्यंत कार्यरत असलेली चक्रीय स्थिती यामुळे मान्सूनचा प्रवास सहजशक्य होत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहिल्यास 1 जूनपूर्वीच मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
इथे आहे यलो अलर्ट
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट्माथा, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर , कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड (काही भाग), लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम , यवतमाळ.