राज्य परीक्षा परिषदेत नोकर भरती, समूह साधन केंद्र समन्वयकाची 2410 पदे भरणार Pudhari
पुणे

MSCE Pune Jobs: राज्य परीक्षा परिषदेत नोकर भरती, समूह साधन केंद्र समन्वयकाची 2410 पदे भरणार

नवीन उमेदवारांना २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील समूह साधन केंद्र समन्वयक या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. नवीन उमेदवारांना २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी १० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण २ हजार ४१० पदांसाठी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे. अधिक माहिती http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर देण्यात असल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) केंद्रप्रमुख किंवा समन्वयकपदासाठी 'समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५' ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

या पदासाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२३ मध्येच परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, त्या वेळी परीक्षा होऊ शकली नाही. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

प्रशिक्षक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवकपदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.

परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यातील निवडीसाठी पात्र राहील. परीक्षेमध्ये १०० गुणांसाठी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, १०० गुणांसाठी शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह असे विषय असतील, असे नमूद करण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेच्या परिपत्रकानुसार सातारा जिल्ह्यात १११, पुणे जिल्ह्यात १५१, नाशिक जिल्ह्यात १२२, रत्नागिरी जिल्ह्यात १२५, अहिल्यानगर जिल्ह्यात १२३, रायगड जिल्ह्यात ११४ पदे उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही पदे उपलब्ध आहेत.

या पदासाठीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता १८ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षक पात्र असल्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT