पुणे : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम सोय व्हावी, या उद्देशाने समाजकल्याण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 55 शासकीय वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता वाढवण्यात आली असून, यामुळे प्रवेशापासून वंचित राहणार्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच, शिक्षणाचे केंद्र असलेल्या लातूरमध्ये 250 विद्यार्थी क्षमतेच्या नवीन वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे. (Pune latets News)
समाजकल्याण विभागाच्या माहितीनुसार, अनेक वसतिगृहे आता शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित झाली आहेत. या इमारती मोठ्या असल्याने उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी हा क्षमतावाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या विभागामार्फत 441 शासकीय वसतिगृहे (230 मुलांची आणि 211 मुलींची) कार्यरत असून, त्यांची एकूण प्रवेशक्षमता 42,890 इतकी आहे. या निर्णयामुळे आता अधिक विद्यार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
सकस आहार : सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचे पोटभर जेवण.
आर्थिक साहाय्य : दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता.
शैक्षणिक साहित्य : गणवेश, पुस्तके, रेनकोट आणि गमबूट.
मुलींसाठी विशेष तरतूद : स्वच्छता प्रसाधनांसाठी अतिरिक्त भत्ता.
इतर सुविधा : कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला साहित्य, शैक्षणिक सहल, कार्यशाळा, स्नेहसंमेलन आणि क्रीडा साहित्यासाठी आर्थिक तरतूद.