Admission Pudhari
पुणे

Maharashtra FYJC Admission 2026: मुलींच्या विशेष फेरीत 47 हजारांहून अधिक प्रवेश निश्चित; आता नव्या फेरीला 16 जुलैपासून सुरुवात

20 जुलैला गुणवत्ता यादी जाहीर; राज्यात अद्याप 10.62 लाखांहून अधिक जागा रिक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील मुलींसाठी राबविण्यात आलेल्या फेरीत ४७ हजार ३३० विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. त्यापैकी ४३ हजार ९८५ प्रवेश केंद्रीभूत (कॅप) प्रवेशांद्वारे, तर ३ हजार ३४५ प्रवेश राखीव कोट्यातून झाले.

आता प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १६ ते २२ जुलै या कालावधीत प्रवेश फेरी राबवली जाणार असून, त्या फेरीची गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित आणि दोन ‌विशेष फेऱ्या राबविण्यात आल्या. मुलींसाठीच्या विशेष फेरीत ५३ हजार ८२४ विद्यार्थिनींना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी ४७ हजार ३३० विद्यार्थिंनीनी प्रवेश निश्चित केला. आतापर्यंत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची फेरी १६ ते २२ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै या कालावधीत नोंदणी करणे, प्रवेश अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, महाविद्यालयांचे पसंतिक्रम नोंदवणे, अर्ज अंतिम करता येणार आहे. २० जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना २० ते २२ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

अकरावीच्या १० लाखांहून अधिक जागा रिक्त

राज्यातील ९ हजार ६९७ महाविद्यालयातील केंद्रीभूत प्रवेशाच्या २२ लाख २५ हजार ८६१ जागांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात १८ लाख ७४ हजार ९१ जागा केंद्रीभूत प्रवेशाच्या, तर ३ लाख ५१ हजार ७७० जागा राखीव कोट्याच्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १४ लाख ८७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पाच फेऱ्यांतून ११ लाख ६३ हजार २० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, अद्यापही १० लाख ६२ हजार ८४१ जागा रिक्त असल्याचे अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT