पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विभागामार्फत नागरिक, व्यावसायिक आणि मद्यनिर्मिती उद्योगांना दिल्या जाणार्या १३४ सेवांची संख्या कमी करून ती ९८ करण्यात आली आहे. समान स्वरूपाच्या सेवांचे एकत्रीकरण, अनावश्यक सेवा वगळणे आणि अर्ज प्रक्रियेचे सुलभीकरण करून हा बदल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या सेवा ४१ टॅबद्वारे ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’ पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे परवाने मिळविण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रशासकीय दिरंगाई कमी होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (आरपीआर) उपक्रमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खालील राज्यस्तरीय मान्यता समितीने या सुधारणांना मान्यता दिली आहे. नवीन व्यवस्थेनुसार शासन ते नागरिक (जीटूसी) प्रकारातील पाच सेवा कायम ठेवण्यात आल्या आहेत. शासन ते शासन (जीटूजी) प्रकारातील दोन सेवा कायम आहेत. तर, शासन ते व्यावसायिक (जीटूबी) प्रकारातील सेवा १२७ वरून ९१ केल्या आहेत. अशा प्रकारे एकूण १३४ सेवांचे रूपांतर ९८ सेवांमध्ये केले आहे.
विदेशी व देशी मद्य विक्री परवान्यांमधील काही बदल
बिअर विक्रीची परवानगी, परवाना हस्तांतरण आणि स्थलांतर यांसारख्या बाबींचा त्यात समावेश आहे. यामुळे छोट्या स्वरूपाच्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत जाण्याची गरज कमी होणार आहे. नवीन परवाने मंजूर करताना शैक्षणिक व धार्मिक संस्था, बसस्थानके आणि महापुरुषांचे पुतळे यांच्यापासूनचे कायदेशीर अंतर, तसेच जागेचे किमान क्षेत्रफळ तपासण्यासाठी स्थळपाहणी बंधनकारक केली आहे.
पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा
सर्व अंतिम प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्याचेही निर्देश आहेत. सेवा मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा आणि प्रत्येक टप्प्याची कार्यपद्धती ठरविण्याची जबाबदारी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांच्यावर सोपवली आहे. या ९८ सेवांचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०२१५ च्या कार्यकक्षेत समावेश करण्यात येणार असून, सेवा, शुल्क, कालमर्यादा आणि अपील अधिकार्यांची माहिती कार्यालये व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे मद्यविक्री व उत्पादनाशी संबंधित व्यावसायिकांना अधिक पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.