Maharashtra Electricity Demand Pudhari
पुणे

Maharashtra Electricity Demand: उन्हाचा तडाखा! प्रतिदिन वीजवापर पोहोचला 30 हजार मेगावॅटच्या घरात

मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाढत्या उन्हाच्या तीवतेमुळे राज्यातील वीजवापरात मोठी वाढ होत आहे. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढणार असून, सध्या मुंबईसह (3 हजार 837 मेगावॅट) राज्यातील प्रतिदिन वीजमागणी 30 हजार मेगावॅटच्या घरात पोहचली आहे.

राज्याला प्रामुख्याने महानिर्मितीच्या कोराडी, नाशिक, चंद्रपूर यांसारख्या प्रमुख औष्णिक वीज केंद्रांतून 7 हजार 175 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून 4,747 मेगावॅट, कोयना व इतर जलविद्युत प्रकल्पातून 2,017 मेगावॅट विजेचा पुरवठा होतो.

सौर आणि पवन ऊर्जासारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून देखील विजेची उपलब्धता वाढत आहे. सौरऊर्जेतून 2,453 मेगावॅट, तर पवनऊर्जेतून 258 मेगावॅट वीज ग्रीडमध्ये येत आहे.

साखर उद्योगांतील सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनही 244 मेगावॅट वीज सध्या महावितरणला मिळत आहे. त्याशिवाय महावितरण पॉवर एक्स्चेंजमधून 625 मेगावॅट वीज खरेदी करण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आगामी दिवसांत उन्हाची तीवता अधिक वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित यंत्रणा आणि कुलर्सचा वापर वाढून विजेची मागणी नव्या उच्चांकावर पोहोचू शकते.

मुंबईची वीज मागणी 3 हजार 837 मेगावॅटवर

मुंबईतील काही भाग वगळता राज्यात महावितरण वीज पुरवते. महावितरणची विजेची मागणी 21 एप्रिल रोजी 26 हजार 744 मेगावॅट होती. त्याच दिवशी मुंबईतील विजेची मागणी 3 हजार 837 मेगावॅट होती. मुंबईसह राज्याचा विचार केला, तर विजेच्या मागणीने 30 हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT