E-NAM Agriculture Market Pudhari
पुणे

Maharashtra E-NAM Agriculture Market Committees: ई-नाम योजनेत मोठा विस्तार: महाराष्ट्रातील 30 नवीन बाजार समित्यांचा समावेश

राज्यात आता एकूण 163 बाजार समित्या ई-नाम अंतर्गत; शेतमालाच्या ऑनलाईन व्यापाराला मिळणार चालना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारच्या ई-नाम योजनेमध्ये राज्यात नव्याने ३० कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश करण्यावर राज्य कृषि पणन मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे यापुर्वीच्या १३३ आणि नवीन ३० मिळून शेतमालाच्या ऑनलाईन व्यापारात समाविष्ट ई-नाममधील बाजार समित्यांची एकूण संख्या आता १६३ होत असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पणन मंडळाच्या संचालक मंडळाची गेल्याच आठवड्यात मार्केट यार्डातील मुख्यालयात बैठक झाली. त्यामध्ये नव्याने तीस बाजार समित्यांमध्ये ई-नामची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यामध्ये वार्षिक सुमारे पाच हजार मेट्रिक टनाचेवर शेतमालाची आवक असलेल्या देऊळगांव राजा, जळगांव जामोद, पुसद, वरुड, सातारा, तासगांव, अहमदपूर, औराद शहाजनी, केज, ब्रम्हपुरी, चिमूर, कळमेश्वर, मांढळ, पुलगांव, जामखेड, कळवण, कर्जत (अहिल्यानगर), पाचोरा, पारोळा, श्रीगोंदा, यावल या अ वर्गातील २१ बाजार समित्यांचा समावेश आहे.

तसेच बाळापूर, लोहा, हिंगणा, आष्टी (वर्धा), साक्री, भुसावळ, अक्कलकोट या ब वर्गातील ७ बाजार समित्या आहेत. तसेच पाटोदा व निलंगा या क वर्गातील २ बाजार समित्या आहेत. तसेच ई-नाम योजनेनुसार प्रति बाजार समिती संगणक सामुग्री, अन्य उपकरणे, वायफाय व इंटरनेटसह अन्य सुविधांसाठी ३० लाख रुपये याप्रमाणे सुमारे नऊ कोटींइतका निधी कृषि पणन मंडळास उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठविला असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

नाशिक बाजार समितीचे विभाजन

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनावर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यातून त्रिंबकेश्वर आणि पेठ तालुक्यासाठी दोन स्वतंत्र बाजार समित्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्हा उपनिबंधकांनी याबाबत पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृषि पणन मंडळ अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी निवृत्ती सन्मान योजना लागू करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव देण्याच्या सूचनाही पणन मंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT