पुणे: महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो.
ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश आपोआप समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ते पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, माजी सनदी अधिकारी डॉ. मलकार्जून कलशेट्टी यांच्यासह राज्यातील तज्ज्ञ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने येत्या 16 सप्टेंबरपासून म्हणजेच मराठवाडा मुक्तिदिनापासून पुढील 100 दिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
“विरोधकांचे कमी उमेदवार निवडून आले, ते आपल्याला संधी मिळाली पाहिजे म्हणून लक्षच देऊन असतात. मुंबईत झालेल्या मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी आपल्याला राजकीय फायदा होईल का, याचाही प्रयत्न केला. पण आता उत्तर मिळाल्यानंतर सगळे गपगार झाले आहेत,” अशी टीका पवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा सर्वांना सोबत घेऊन चला, हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम आहे.
सर्व सुरळीत होईल...
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. सगळेजण माध्यमांसमोर म्हणणे मांडत होते, आता त्यांना उत्तर मिळाल्याचे सांगत पवार म्हणाले, “समोरची लोकं लक्ष देऊन बसलेलीच असतात. कमी निवडून आलो आहोत, संधी शोधतात. आरक्षणाबाबतच्या सरकारच्या निर्णयामुळे काय होईल याची उगाचच चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही शंका न घेता सर्व सुरळीत होईल.”