पुणे: शैक्षणिक सत्र 2025-26 साठी सुरू असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोट्यातील रिक्त जागा शासनाला परत करण्याची (प्रत्यार्पण) कार्यवाही सुरू झाली आहे. शासन निर्णयानुसार, अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या व्यवस्थापन आणि इन-हाऊस कोट्यातील रिक्त जागा प्रत्यार्पित करणे ऐच्छिक आहे. संबंधित महाविद्यालयांनी लॉगिनद्वारे जागा परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यक दर्जा प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना जर दुसर्या फेरीसाठी अल्पसंख्याक कोट्यात प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले, तर प्रथम त्यांना प्रवेश द्यावा लागेल. त्यानंतरच उर्वरित रिक्त जागा कॅप फेरी-2 मध्ये समाविष्ट केल्या जातील. (Latest Pune News)
प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी प्राधान्यक्रम अद्ययावत करावेत. तसेच विद्यार्थी 1 ते 10 पर्यंत प्राधान्यक्रम देऊ शकतात. अर्जाचा भाग 1 व 2 पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. अल्पसंख्याक तसेच बिगर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांना आपला व्यवस्थापन कोटा व इन-हाऊस कोटा यामधील रिक्त जागा प्रत्यार्पित करणे ऐच्छिक आहे.
अल्पसंख्याक दर्जा प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागा प्रत्यार्पित करणे ऐच्छिक असून, दुसर्या फेरीच्यावेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरिता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील व प्रत्यार्पित केलेल्या जागांपैकी रिक्त जागा असल्यास तेवढ्या जागा कॅप फेरी-2 करिता विचारात घेण्यात येतील, असे देखील स्पष्ट केले आहे.
पहिली फेरी द़ृष्टिक्षेपात
प्रवेश जाहीर झाला - 6 लाख 32 हजार 194
महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या - 5 लाख 08 हजार 096
महाविद्यालयांनी प्रवेश अमान्य केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या - 6 हजार 402
प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या - 1 हजार 944
प्रवेशासाठी गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या - 1 लाख 94 हजार 135