पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या क्रूर हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) स्पष्टच बोलले आहेत. बीड प्रकरणी प्रकरणी एसआयटी, सीआयडीकडून चौकशी सुरु आहे. कुणाचे कुणाला फोन गेले? याची चौकशी होईल. पक्ष न बघता दोषींवर कारवाई होईल, असे अजित पवार यांनी आज गुरुवारी पुण्यात बोलताना सांगितले. दरम्यान, पुराव्यांशिवाय आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बीड प्रकरणी पुरावे मिळाले की कारवाई केली जाईल. या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. जे दोषी आहेत त्यांना पाठीशी घालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही. मुख्यमंत्रीदेखील तसे म्हणालेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. पण सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत. आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. बडी मुन्नी कोण? ते त्यांना विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन, असेही अजित पवार म्हणाले.
मी सुरेश धस यांच्याबाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे आहे ते सांगितले आहे. ते योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सात खासदारांना अजित पवार गटाने आपल्याकडे खेचण्याचा आणि शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, माझा पक्ष, त्यांचा पक्ष वेगळा. त्यांचा निर्णय ते घेतील. त्यांच्या खासदारांशी कोणीही संपर्क साधलेला नाही.
छगन भुजबळ यांच्याविषयीही त्यांनी भाष्य केले. छगन भुजबळ हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर आम्ही मार्ग काढू, असेही ते स्पष्ट बोलले.