

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सात खासदारांना अजित पवार गटाने आपल्याकडे खेचण्याचा आणि शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवारांसोबतच्या सातही खासदारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव धुडकावल्याचेही वृत्त आहे.
शरद पवार गटाची बैठक मुंबईत सुरू असतानाच हे वृत्त पद्धतशीरपणे पसरवून शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांकडे गेल्यास त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याची चाचपणी तर घेतली जात नाही ना, असाही संशय राजकीय वर्तुळात आहे. बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत चला, असा प्रस्ताव अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना हिवाळी अधिवेशनातच देण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवार यांना सोडून इतर सर्व खासदारांना प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठवला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्लीमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना हा प्रस्ताव दिल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, हा प्रस्ताव कानी पडताच सुप्रिया सुळे संतापल्या आणि नंतर त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, शरद पवार यांचा गट फोडण्याचा आमच्याकडून कोणताही प्रयत्न केला गेला नाही, कुणालाही फोन गेला नाही. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. त्यामध्ये कधीही बाप-लेक असा शब्दप्रयोग मी केलेला नाही. मात्र, तटकरे नव्हे, तर सोनिया दुहान या संपर्क करत होत्या, अशी माहिती शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी दिली.