Dam  Pudhari
पुणे

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांतील पाणीसाठा २२.६८ टक्क्यांवर; २६ धरणे उपयुक्त पाणीसाठ्याविना

पुणे विभागात सर्वाधिक चिंताजनक स्थिती; मान्सूनच्या जोरदार पावसाकडे प्रशासनाच्या नजरा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जून महिन्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असला, तरी पावसाचा जोर अद्याप समाधानकारक नसल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या केवळ २२.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ३९.९९ टक्के होता; म्हणजेच पाणीसाठ्यात तब्बल १७.३२ टक्क्यांची घट झाली आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील २६ धरणांमध्ये पाणीसाठा शून्यावर पोहचला आहे. या धरणांमध्ये एक थेंबही उपयुक्त पाणी उरलेले नसल्याने संबंधित भागातील पाणीपुरवठा, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे ही धरणे पुन्हा भरून काढण्यासाठी आगामी काही दिवसांत व्यापक आणि मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे, जून महिन्यात मान्सूनने काही भागांत हजेरी लावली असली, तरी राज्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणांकडे येणारा पाण्याचा ओघ अत्यल्प आहे. पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढला, तरच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती पुणे विभागात असून, येथे धरणांमध्ये केवळ १३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील अनेक प्रमुख धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमरावती विभागात ३७.६४ टक्के आणि नागपूर विभागात ३०.५८ टक्के पाणीसाठा असल्याने या दोन विभागांची स्थिती तुलनेने काहीशी समाधानकारक आहे.

कोकण विभागात २७.९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात २४.७४ टक्के, तर नाशिक विभागात २४.१३ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत आधीच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, धरणांमधील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे पावसाने आणखी दिरंगाई केल्यास ग्रामीण भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.

या २६ धरणांमध्ये उरला शून्य टक्के पाणीसाठा

गोसेखुर्द (भंडारा), कालीसरार (गोंदिया), खडकपूर्णा (बुलडाणा), बोरगाव अंजनपूर (बीड), रोशनपूरी (बीड), सिरसमार्ग (बीड), वांगदरी (बीड), सिद्धेश्वर (हिंगोली), किनवट (नांदेड), लोणी सांगवी (नांदेड), गुंजारगा (धाराशिव), निम्न तेरणा (धाराशिव), सिना कोळेगाव (धाराशिव), तागरखेडा (धाराशिव), बिंडगीहाळ (लातूर), साई (लातूर), भाम (नाशिक), भावली (नाशिक), पुणेगाव (नाशिक), तिसगाव (नाशिक), तिल्लारी (कोल्हापूर), पिंपळगाव जोगे (पुणे), घोड (पुणे), टेमघर (पुणे), लोणावळा टाटा (पुणे), भीमा (सोलापूर).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT