पुणे: भारतीय परिचारिका परिषदेने (आयएनसी) दिलेल्या सूचनेनुसार झालेल्या बीएस्सी नर्सिंगच्या संस्थात्मक कोट्याच्या तिसऱ्या फेरीनंतरही तब्बल साडेपाच हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. या अभ्यासक्रमाची तिसरी संस्थात्मक फेरी 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली. त्यानंतर सरकारी महाविद्यालयांत सहा आणि खासगी महाविद्यालयांतील 5 हजार 567 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे नर्सिंग अभ्यासक्रमांची क्रेझ घसरल्याचे दिसून येत आहे.
सीईटी कक्षातर्फे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 7 आणि 8 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. यंदा 16 हजारांपेक्षा जास्त जागा उपलब्ध होत्या. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी राज्यभरातून 47 हजार 501 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 43 हजार 191 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबरला नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आली. या प्रक्रियेनंतरही अनेक नर्सिंग महाविद्यालयात जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहिल्याने या संस्थांनी इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि सीईटी कक्षाकडे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
या विशेष संस्थात्मक प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची मुदत 31 डिसेंबर रोजी संपुष्टात आली. त्यानंतरही बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या राज्यभरात तब्बल 5 हजार 573 जागा रिक्त आहेत. राज्यात यंदा शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची 17 महाविद्यालये आणि 277 खासगी महाविद्यालये अशा 294 महाविद्यालयात 16 हजार 530 जागा उपलब्ध होत्या.
त्यात संस्थात्मक प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीअखेरीस 17 सरकारी महाविद्यालयातील 1 हजार 180 जागांपैकी 1 हजार 174 जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून, केवळ 6 जागा रिक्त आहेत. तसेच 277 खासगी महाविद्यालयांमध्ये 15 हजार 350 जागा उपलब्ध होत्या. यापैकी 9 हजार 783 जागांवरील प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण झाल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) जाहीर केले.
त्यामुळे खासगी महाविद्यालयांमधील 5 हजार 567 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील 5 हजार 573 रिक्त जागांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला असून नर्सिंग अभ्यासक्रमांची क्रेझ घसरली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.