पुणे: राज्यातील बी. फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) अभ्यासक्रमांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यावर्षी तब्बल 54 हजार 921 विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर झाली असून, 25 ते 27 सप्टेंबर या काळात या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतिक्रम भरता येणार आहेत. यानंतर 29 सप्टेंबर रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होणार असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. (Latest Pune News)
राज्यातील फार्मसी संस्थांना दरवर्षी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडून मान्यता घेणे बंधनकारक असते. यामुळे दरवर्षी काही प्रमाणात विलंब होतो. मात्र, यंदा वारंवार प्रवेशाची मुदत वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभमाचे वातावरण होते. यंदाही तब्बल दोन ते तीन महिने प्रवेश वेळापत्रक लांबणीवर गेल्याने शैक्षणिक सत्र उशिरा सुरू होणार आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्या होणार आहेत.
प्रत्येक फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनद्वारे पसंतीनुसार प्रवेश स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘फ्रीझ’ किंवा ‘बेटरमेंट’ असे दोन पर्याय उपलब्ध असतात. जर विद्यार्थ्याला मिळालेले फार्मसी महाविद्यालय पसंत असेल तर तो फीझ पर्याय निवडून ती जागा निश्चित करू शकतो.
मात्र, विद्यार्थ्याला पुढील फेरीत यापेक्षा चांगले महाविद्यालय मिळावे, अशी अपेक्षा असेल तर त्याने बेटरमेंट पर्याय निवडणे गरजेचे आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास तो प्रवेश आपोआप ‘ऑटो फ्रीझ’ होईल आणि अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांत सहभागी होता येणार नाही.
तसेच, प्रवेश कन्फर्म करताना ऑनलाइन शुल्क भरणे बंधनकारक आहे. चुकीची कागदपत्रे सादर केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास उमेदवाराचा प्रवेश नाकारला जाईल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
गतवर्षी देखील बी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेत अशीच अडचण होती. प्रवेश उशिरा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे राज्यातील 48 हजार 51 जागांपैकी 31 हजार 827 प्रवेश झाले, तर उर्वरित जागा रिकाम्याच राहिल्या.
यंदाही प्रवेश उशिरा सुरू होत असल्याने तसाच प्रकार होण्याची भीती आहे. दरवर्षी उशिरा जाहीर होणारे वेळापत्रक, मान्यता प्रक्रियेतील अडथळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे फार्मसी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. राज्यातील हजारो उमेदवारांनी नोंदणी केली असली, तरी शेवटच्या क्षणी जागा रिकाम्या राहण्याची भीती संस्थाचालक व्यक्त करीत आहेत.
पदवी प्रवेशासाठी असे असणार वेळापत्रक
24 सप्टेंबर : जागांची माहिती आरक्षणनिहाय जाहीर होणार
25 ते 27 सप्टेंबर : प्रवेशासाठी पसंतिक्रम/संस्था पर्याय भरणे
29 सप्टेंबर : प्रवेशाची पहिली फेरी
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर : प्रवेश घेणे व कागदपत्र पडताळणी
4 ऑक्टोबर : फेरी 2 साठी रिक्त जागांची यादी
5 ते 7 ऑक्टोबर : प्रवेशासाठी पसंतिक्रम/संस्था पर्याय भरणे
10 ऑक्टोबर : प्रवेशाची दुसरी यादी
11 ते 13 ऑक्टोबर : प्रवेश घेणे व कागदपत्र पडताळणी
14 ऑक्टोबर : रिक्त जागांची यादी
15 ते 17 ऑक्टोबर : प्रवेशासाठी पसंतिक्रम/ संस्था पर्याय भरणे
19 ऑक्टोबर : प्रवेशाची तिसरी फेरी
25 ते 27 ऑक्टोबर : प्रवेश घेणे व कागदपत्र पडताळणी
28 ऑक्टोबर : रिक्त जागांची माहिती
29 ते 31 ऑक्टोबर : प्रवेशासाठी पसंतिक्रम/ संस्था पर्याय भरणे
2 नोव्हेंबर : प्रवेशाची चौथी फेरी
3 ते 6 नोव्हेंबर : प्रवेश घेणे व कागदपत्र पडताळणी
7 ते 14 नोव्हेंबर : संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया
12 नोव्हेंबर : प्रवेश रद्द करून पूर्ण शुल्क परत घेण्याचा अंतिम दिवस
14 नोव्हेंबर : प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत