पुणे: भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्राला महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. नवोन्मेष, संशोधन आणि विद्यार्थ्यांमध्ये जागतिक क्षमतेचा विकास हे आपले ध्येय असले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रश्न असून ते सोडविण्यात येत आहे.
याखेरीज, विकसित राष्ट्राचे व्हिजन पूर्ण करण्याबाबत कुठेही कमी पडू नये, यासाठी येणारी मनुष्यबळाची समस्या दूर केली जाणार आहे. त्याअंतर्गत, राज्यात 5,500 अधिव्याख्याता आणि 2,900 कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Latest Pune News)
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, उच्च शिक्षा संवर्ग महाराष्ट्र प्रदेश आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या वतीने विकसित महाराष्ट्र 2047 - जाणीव - जागृती या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
शिवाजीनगर येथील मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे आयोजित कार्यशाळेवेळी शैक्षणिक महासंघ राष्ट्रीय सचिव प्रदीप खेडकर, राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग संचालक प्रा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांसह राज्यभरातून प्राध्यापक उपस्थित होते. पाटील म्हणाले, व्हिजन 2047 चा पहिला टप्पा म्हणजे 2029 साल असेल.
तोपर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपला दर्जा सुधारणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत आपले स्थान उंचावले असून, येत्या पाच वर्षांत जगातील टॉप 500 विद्यापीठांच्या यादीत आपले स्थान मिळवलेच पाहिजे, अशी मी कुलगुरू यांच्यासह सर्व प्रमुखांकडे अपेक्षा व्यक्त केली आहे.
हीच अपेक्षा मी राज्यभरातील विद्यापीठांमधून आलेल्या प्राध्यापकांकडे व्यक्त करतो. राज्यात सध्या सरकारकडे पैसेच नाहीत, अशी चर्चा केली जात आहे. तरीही आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पाटील यांनीया वेळी दिली.
प्रा. डॉ. देवळाणकर म्हणाले की, भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, पर्यावरण व संरक्षण या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे. भारताचे सांस्कृतिक मूल्य ही आपली प्रेरणा असावी. पुढील काळात शिक्षकांची भूमिका सीमेवरील सैनिकांसारखी असेल. शिक्षण संस्थांनी मूल्याधिष्ठित आणि तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे. युवकांना उद्योजक बनवणे हेही शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे, असे प्रा. डॉ. एकबोटे यांनी नमूद केले. या वेळी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी शिक्षण क्षेत्राचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.