पुणे: राज्यातील 29.80 लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी अद्याप नोंदणीच केली नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिक्षण विभागाने आता 31 जानेवारी 2026 पर्यंत अपार आयडी काढण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच दररोज अपार आयडी संदर्भात अहवाल घेण्याच्या सूचना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्यातील 85.5 टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच केली नाही.
त्यामुळे केंद्रीय शिक्षण सचिवांनी यावर बैठक घेऊन अपार आयडीचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा, तालुका केंद्र स्तरावर शिबिर घेऊन प्रलंबित विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे अपार आयडी काढताना काही अडचणी येत असल्यास प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशाही सूचना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिल्या आहेत.
सर्व प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी अपार आयडी बंधनकारक
राज्यातील 2 कोटी 15 लाख 45 हजार 194 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 84 लाख 21 हजार 224 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. त्यातच अपार आयडी असल्याशिवाय सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. तसेच सर्व प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अपार आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी काढावाच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.