पुणे: कोणत्याही शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषण हे वाहनांमुळे होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर केला जाणार असून, त्यांना लागणारी वीज देखील हरित स्रोतातून दिली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एका मोबिलिटीच्या सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणीवस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, वाढत्या प्रदूषणामुळे स्वच्छ आणि हरीत वाहतूक ही आपली प्राथमिकता झाली आहे. केंद्र सरकार ई-वाहनांना प्राथमिकता देत असून, महाराष्ट्र ईव्हीचे हब बनले आहे. पुण्याबरोबरच छत्रपती संभाजीननगर नागपूरमध्ये ईव्हीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
महाराष्ट्र सरकार देखील तीन वर्षांत ५० हजार बस ई-बस घेणार आहे. वाढत्या इलेक्ट्रिक बसला लागणारी ऊर्जा हरित असेल, याची काळजी घेतली जाईल. २०३० पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण विद्युत निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा ५२ टक्के टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. अगदी डेटा सेंटर्सला देखील ५० टक्के ऊर्जा हरित स्रोतांद्वारे दिली जाईल.
‘चार्जिंग परिसंस्था उभारणार’
वाढत्या ईव्हीसाठी चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासेल. ईव्ही उत्पादकांना सोबत घेऊन चार्जिंग परिसंस्था सरकार उभारेल. कंपन्यांना चार्जिंग स्टेशन्ससाठी आवश्यक असेली जमीन आणि इतर परवानग्या आम्ही देऊ. या चार्जिंग स्टेशनसाठी सोलर आवरमध्ये सौरऊर्जा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.