पुणे: कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत (आत्मा) आत्मा योजनेअंतर्गत प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारीपदासाठी गावपातळीवर एक शेतकरी मित्र निवडण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात एकूण ११ हजार ५८७ शेतकरी मित्र निवडीचे उद्दिष्ट कृषी आयुक्तालयाने निश्चित केले आहे.
शेतकरी मित्राचे कार्यक्षेत्र संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र राहील. मात्र, शहरीकरण झालेल्या व लागवडीयोग्य कृषीक्षेत्र अत्यल्प असलेल्या भागात शेतकरी मित्राची निवड करण्यात येणार नसल्याची माहिती ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर यांनी दिली.
शेतकरी मित्र गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना व कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, शेतकरी गटांची निर्मिती व क्षमता बांधणीस साहाय्य करणे, शेतीशाळांसाठी लाभार्थी निवड व आयोजनास मदत करणे, नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करणे तसेच शेतकरी प्रशिक्षणाच्या आयोजनास साहाय्य करणे अशी विविध कामे करतील.
शेतकरी मित्रांना दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक १८ हजार रुपये मानधन देय राहील. गावपातळीवर कृषीविस्तार यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून शेतकरी मित्र कार्यरत राहतील. अनुभवी, प्रयोगशील व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतकरी मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे.
शेतकरी मित्रांच्या कामाचा दर तीन महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या आढाव्यात एका सत्रात हंगामपूर्व प्रशिक्षण, दुसऱ्या सत्रात मागील तीन महिन्यांच्या कामकाजाचा आढावा आणि नंतर पुढील तीन महिन्यांसाठी कामाचे लक्ष्य निश्चित करण्यात येईल. संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर अहवालाची पडताळणी तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येईल आणि त्यानंतर मानधन अदा केले जाईल.सूरज मांढरे, कृषी आयुक्त