यवत: यवतला वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी यवत मुक्कामी येत आहे. यानिमित्ताने यवत परिसरातील घरोघरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनविण्यासाठी लगबग सुरू आहे.
संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम पालखी सोहळा आज सोमवार (दि.२३) सायंकाळी यवत मुक्कामी येणार आहे. पालखी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण भागातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. (Latest Pune News)
Shikrapur Labor Pr
यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जवळपास एक हजार किलोपेक्षा अधिक पिठलं तयार करण्यासाठी आज सकाळपासूनच लगबग सुरू झाली आहे.गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच – दहा भाकरी पासून १०० भाकरी मंदिरात आणून देतात. तर श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मंदिर परिसरात ३०० किलो पिठाच्या भाकरी बनविण्यात येत असतात.
गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी मंदिरात देण्यात येतात .जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आगमन व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते.
यवत येथील प्रसिद्ध पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी पोलीस प्रशासन, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांसह नागरिकांमध्ये आतुरता असते. परंपरेनुसार या ठिकाणी यवत ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने आणि प्रेमाने पिठलं भाकरी बनविण्यासाठी आणि महाप्रसाद वाटप करण्यासाठी तयारी करतात.