पुणे : पुढारी वृत्तसेवा
जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मोफत प्रशिक्षण देणार आहे.
तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दिली. जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षांची तयारी करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग व प्रशिक्षण देण्याचा निर्णय 'महाज्योती'चे अध्यक्ष तथा ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार मार्च 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन 2024 च्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर 1 मे 2022 पासून मोफत नोंदणी सुरू झालेली आहे.
प्रशिक्षणासाठी शहरी भागातील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 70 टक्के गुण, तर ग्रामीण भागातील, आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. महाज्योतीकडे 2022 च्या जेईई, नीट परीक्षेसाठी तीन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, त्यांना मोफत टॅबसह प्रशिक्षण देण्यात आले. 2023 च्या नीट परीक्षेसाठी 10 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे, तर 2024 साठी पंधरा हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट 'महाज्योती'ने ठरविले आहे.
विद्यार्थ्यांनी 'महाज्योती'च्या संकेतस्थळावर जाऊन मोफत नोंदणी करावी. महाज्योती प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावरच विद्यार्थ्यांसाठी 1 जुलै 2022 पासून ऑनलाइन प्रशिक्षण सुरू करणार आहे. तरी 'महाज्योती'च्या या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच पालक व शिक्षकांनीही याबाबत जागृती करून मार्गदर्शन करावे, असे आवाहन गमे यांनी केले आहे.