पुणे

Mahadev Betting App Case | ऑनलाइन सट्टेबाजीसाठी 452 बँक खात्यांचा वापर

Laxman Dhenge

पुणे/नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : महादेव बुक अ‍ॅप या बेकायदा बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, जुगारातील आर्थिक व्यवहारांसाठी 452 बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. हा पैसा परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय आहे. नारायणगावातील एका इमारतीत छापा टाकून पोलिसांनी 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 93 जणांना ताब्यात घेतले आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून बेकायदा सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर देशभरात कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नारायणगावातील एका इमारतीत छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 45 लॅपटॉप, 89 मोबाईल संच तसेच आरोपींच्या वापरातील 101 मोबाईल संच आणि 452 बँक खात्यांची पुस्तिका, अन्य साहित्य असा 62 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी ऑनलाइन सट्टेबाजीसाठी बँक खात्यांचा वापर केला आहे. ही खाती कोणाच्या नावे काढण्यात आली तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून खाती काढण्यात आली का? यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात 93 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 88 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात कुणाल भट, समीर युनूस पठाण, अमजद खान, यश चौहान, रशीद कमाल रफीउल्ली यांना अटक करण्यात आली. आरोपी नारायणगावातील ऑनलाइन जुगाराचे कामकाज सांभाळत होते. ते पदवीधर आहेत. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, किरण अवचर, सतीश होडगर आणि पथकाने ही कारवाई केली.

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून मिळालेला पैसा देशविघातक कारवायांत वळविण्यात आला आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ऑनलाइन सट्टेबाजीतून मिळालेला पैसा परदेशात वळविण्यात आला आहे. नारायणगावातील एका इमारतीत बीपीओच्या नावाखाली ऑनलाइन जुगार सुरू होता. तेथे काम करणार्‍या आरोपींना याची माहिती होती.

– पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक

बीपीओच्या नावाखाली जुगार; मुख्य सूत्रधार पसार

नारायणगावातील ऋतिक कोठारी, सलमान मिरजकर ऊर्फ पठाण, राज बकोरिया आणि साथीदारांनी नारायणगावात बीपीओ सुरू करण्यात येणार असल्याची बतावणी जागामालकाकडे केली होती. त्याच्याकडून इमारत भाडेतत्त्वावर घेतली होती. दीड ते दोन महिन्यांपूर्वी त्यांनी जागा भाड्याने घेतली होती. बीपीओत देशभरातील तरुण काम करीत होते, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT