Recruitment Pudhari
पुणे

Mahabeej Revised Staffing Structure: महाबीजच्या 723 पदांना मंजुरी; 13,275 कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाबीजचा सुधारित आकृतिबंध मंजूर, कृषी विभागासाठी 109 कोटींच्या डिजिटल सक्षमीकरण योजनेला हिरवा कंदील

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) अकोला, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता दिली आहे. हा आकृतिबंध अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता ‘महाबीज’च्या विद्यमान आकृतिबंधामध्ये सुधारणा करून ५६० नियमित पदे, १०० अधिसंख्य पदे आणि ६३ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या निर्णयामुळे महाबीज संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास, प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम होण्यास तसेच बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी 'महाबीज'ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे.

राज्यातील १३ हजार २७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने १०९ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात लॅपटॉपचा पुरवठा जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहचविण्यात येतील. पुरवठादाराकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक लॅपटॉपची शंभर टक्के गुणवत्ता तपासणी पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ या स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

लॅपटॉपमुळे डिजिटल प्रशासनाला चालना मिळून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कृषी विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाला अधिक गती देण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कृषी प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी फायदा अपेक्षित आहे. क्षेत्रीय कर्मचारी वर्गात लॅपटॉप पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने सन २०२१ पासून तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना २०२३ पासून केलेली आहे. या संघटनांसोबत कृषी आयुक्तालय स्तरावर तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी व मागणी समजावून घेण्यात आली आहे.

सुधारित आकृतिबंधातील पदे

सुधारित आकृतिबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहारेकरी, लघुलेखक निम्नश्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्याची तरतूद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT