पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे बीपीएड, एमएड, बीएड-एमएड व एमपीएड या चार अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षेतील प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप नोंदविण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे आक्षेप मान्य करून उत्तरतालिकेमध्ये बदल करण्यात आला आहे.
यानुसार या चार अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. निकालानंतर संबंधित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएड या अभ्यासक्रमाकरिता ‘चाचण्याचे मोजमाप’ या विभागांतर्गत 1 आक्षेप प्राप्त झाला होता. या तिन्ही अभ्यासक्रमाकरिता दिनांक 1 ते 3 मे 2026 या कालावधीत विद्यार्थ्यांच्या लॉगिन पोर्टलवर ‘आक्षेप ट्रॅकर’ उपलब्ध करून देण्यात आला होता.
तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार उत्तरतालिकेत बदल करण्यात येईल व ही उत्तरतालिका अद्ययावत करून निकालाची पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे सीईटी कक्षानी स्पष्ट केले आहे.
बीएड-एमएडतील तीनही आक्षेप ठरले अवैध
बीपीएड आणि एमएड अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न किंवा उत्तरांच्या पर्यायाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याने कोणताही आक्षेप नोंदवला नाही. बीएड-एमएड या अभ्यासक्रमाकरिता ‘मानसिक क्षमता’ या विभागांतर्गत 3 आक्षेप प्राप्त झाले होते. पण, ते तिन्हीही आक्षेप तज्ज्ञांनी अवैध केले आहेत. तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, उत्तरतालिकेमध्ये कोणताही बदल नसल्याने निकालाची पुढील प्रक्रिया केली जाईल.