पुणे: व्यसनाधीनता, नैराश्य आणि आत्महत्येसारख्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ्य जपण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ‘मानस सूत्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथमच १ हजार २३१ समुपदेशकांची (काउन्सलर) नियुक्ती केली आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणाच्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १ हजार २३१ समुपदेशकांची नियुक्ती केल्याची माहिती नमूद केली आहे. या सर्व समुपदेशकांची नावे आणि मोबाईल क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याशी संबंधित बाबींवर प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘मानस सूत्र’ उपक्रमांतर्गत समुपदेशकांसाठी तीन दिवसांचा विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रशिक्षणाची पहिली ५० जणांची तुकडी मागील महिन्यात पूर्ण झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या समुपदेशकांना प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था कडून देण्यात येणार आहे.
‘मानस सूत्र’ उपक्रमाकडे विशेष लक्ष
सोशल मीडियामुळे जगाशी संपर्क वाढला असला, तरी व्यक्ती म्हणून वाढत चाललेले एकटेपण, मानसिक ताण आणि भावनिक अस्वस्थता ही आजच्या काळातील गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक स्वास्थ्यासाठी राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर समुपदेशकांची नियुक्ती केल्याने ‘मानस सूत्र’ उपक्रमाकडे विशेष लक्ष लागले आहे.