पुणे: रविवारी रात्री 9.40 ते पहाटे 1.30 पर्यंत संपूर्ण भारतातील नागरिकांनी खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. टीव्हीवर आस्था विरुद्ध विज्ञान अशी स्पर्धा रंगलेली असतानाच धार्मिक नागरिकांनी जप करत तर वैज्ञानिक नागरिकांनी चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद लुटला पुण्यातील केसरीवाड्यावर ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने चंद्रग्रहण पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने चंद्रग्रहण दिसते की नाही, याबद्दल शंका होती. मात्र रात्री नऊ वाजता चंद्राचे प्रखर बिंब ढगांमधून बाहेर आले आणि पांढरेशुभ्र खळे दिसले. (Latest Pune News)
चंद्र ढगाच्या आत-बाहेर जात होता. मात्र ग्रहणाचा स्पर्श होताच सर्व ढग बाजूला झाले रविवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांची ग्रहणाचा स्पर्श झाला. हळूहळू पांढरा चंद्र, पिवळा, तांबूस आणि शेवटी लाल झालेला दिसला. रात्री 12.30 नंतर ग्रहण सुटण्यास सुरुवात झाली तेव्हा चंद्र तांबूस ते पांढराशुभ्र होत गेला.
पुण्यातील केसरी वाड्यातून लाईव्ह चंद्रदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारच्या दुर्बिणींनी हे चंद्रग्रहण विद्यार्थ्यांनी पाहिले. जपानमधील चंद्रग्रहण या ठिकाणी शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवले.
पुण्यात रात्रीचे 11 वाजले तेव्हा जपान देशात पहाटेचे अडीच वाजले होते. जपानमधील मराठी शास्त्रज्ञांनी तेथील चंद्रग्रहणाची माहिती दिली. भारतात सर्व शहरातून एकसारखेच चंद्रग्रहण दिसले. लोकांनी मोबाईलमधूनही या छटा टिपल्या. मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली, लखनौ, हैदराबादसह अनेक शहरातून हे ग्रहण दाखविले जात होते.