पुणे

सध्याच्या राजकारणात निष्ठेचा झाला नायनाट : विकासाच्या बाता आता कोसो दूर

Laxman Dhenge

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या राजकारणाच्या तुलनेत आज आधुनिकतेकडे झुकलेल्या राजकारणात अत्यंत वेगाने मोठे आमूलाग्र बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काहीतरी कुठेतरी बिनसतंय, ही बाब पुढे आली आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते, वरिष्ठ यांच्यात अचानक झालेले बदल मतदारांना अवाक करू लागले आहेत. अशा झालेल्या बदलांमुळे राजकारण जरी झकास असले, तरी विकास फाट्यावरच राहिल्याचे चित्र मनामनात रुजत आहे.

पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये मोठी सहनशीलता होती. त्यामुळे विरोधात असलेल्या भाजपाला सत्तेत यायला अनेक वर्षे वाट पहावी लागली. त्या काळात भाजपला प्रचंड आत्मविश्वास असल्याने विरोधक म्हणूनही त्यांनी स्वतःचा काळ खूप गाजवला आणि आता सत्ताधारी म्हणून मान्यता मिळविण्यात यशस्वी झाला. भाजपाने घडवलेली क्रांती सर्वज्ञात असताना या पक्षात निवडणुकीपूर्वी झालेले मोठे इनकमिंगही सर्वांनी पाहिले. याच इनकमिंगमुळे अनेकांची गोची झाली. शिवसेना फोडण्यात मिळालेले यश व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसमवेत 40 आमदार आपल्या गटात सहभागी करण्यात मिळालेले यश यामुळे भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांच्यापासून वेगळे करण्यात मिळालेले मोठे यश, त्यामुळे भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. आता भाजप चाणक्य नीतीच्या बळावर लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहे.

एकूणच राजकारणात नेत्यांची वृत्ती बदलली म्हणून कार्यकर्तेही बदलतात असाच काहीसा प्रकार पहायला मिळत आहे. सद्य:स्थितीत राजकीय प्रवाह बघितला तर आजचे राजकारण खूप बदलले असल्याचे स्पष्ट जाणवते आहे. यापूर्वी उमेदवार सायकलवरून प्रचार करीत होते. निवडणुका लढण्यासाठी लोकवर्गणी गोळा होत असे. कार्यकर्ते, नेते एकनिष्ठ असायचे, नेतेदेखील कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असायचे, नेते मंडळींचा त्यावेळी एक वेगळा दरारा व आदर मानला जायचा. त्यामुळे कार्यकर्ते कट्टर समर्थक बनायचे. आता या सर्व गोष्टी इतिहासजमा झाल्यात.

आता नेत्यांची भूमिका वारंवार बदलत आहे. त्यामुळे कार्यकर्तेही भूमिका बदलू लागले आहेत. पूर्वी कार्यकर्ते स्वखर्चातून पेट्रोल जाळून नेत्यांचा प्रचार करायचे, आता नेत्यांना कार्यकर्तेच मिळत नाहीत म्हणून सभेला भाडेतत्त्वावर शेकडो लोक गोळा करावे लागत आहेत. पूर्वी निष्ठेने मतदान होत असे, आता धाब्यावर जेवणावळी घालूनही मते मिळत नाहीत, ही खरी राजकीय शोकांतिका आहे.

सूडबुद्धीच्या राजकारणात प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी

पूर्वी वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असायची, आता निष्ठेचा नायनाट झाल्यामुळे सकाळी नेता एका सभेला तर तोच नेता दुपारी भलत्याच सभेत हजेरी लावून नव्याने पक्षप्रवेश करीत असल्याने एकनिष्ठा वार्‍यावर तरंगत आहे. सूडबुद्धीच्या राजकारणात प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी जात आहे. हे आजच्या राजकारणाचे वास्तव असून, विकास भकास अन् बकवास झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT