पुणे

पुरंदरमध्ये 5 वर्षांतील सर्वांत कमी पर्जन्यमान; चारा, पाण्याची टंचाई

अमृता चौगुले

वाल्हे(पुणे) : पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, मागील काही वर्षांमध्ये चांगला पाऊस झाल्याने ते चित्र काही प्रमाणात पुसले गेले होते. मात्र, यंदा पावसाचे कमी प्रमाण तुरळक असल्याने पुन्हा एकदा पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तालुक्यामध्ये मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाऊस पडलेला असल्याचे तहसीलदार व कृषी विभागाने जाहीर केले आहे. ऑगस्ट महिना संपल्यानंतर सासवड, जेजुरी, राजेवाडी, वाल्हे, परिंचे, कुंभारवळण, भिवडी या सर्व मंडलांमध्ये मिळून एकूण केवळ 813 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरी फक्त 116 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामध्येही भिवडी, सासवड, जेजुरी या तीन मंडलात 533 मिलिमीटर पाऊस पडला असून, उर्वरित तालुक्यात केवळ 280 मिलिमीटर पावसाची नोंद आहे.

सासवड, जेजुरी, राजेवाडी, वाल्हे, परिंचे, कुंभारवळण, भिवडी या मंडलांमध्ये 2018 पासून ते 2023 पर्यंतचा सर्वात कमी पाऊस यंदाच्या वर्षी नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्याच्या कृषी संस्कृतीवर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, तसेच आर्थिक चलन फिरण्यामध्येही मोठी तफावत होणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकरी मागणी करू लागले आहेत. जवळपास तालुक्यातील सर्वत्रच विहिरींनी तळ गाठला आहे.

या अत्यल्प पावसाने खरीप हंगामाचा पेरा वाया गेला आहे. आहे ती पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. काही शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करूनदेखील आता पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे, त्यामुळे दुष्काळ जाहीर करुन पाण्याचे टँकर, जनावरांसाठी छावण्या, शेतकर्‍यांसाठी पीक विमा, नुकसानभरपाई यासाठी विविध राजकीय पक्षांच्या व शेतकर्‍यांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत.

सन 2018 ते ऑक्टोबर 2023 अखेर झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
वर्ष       एकूण    सरासरी
2018    2544     363
2019    6530     933
2020   5014      716
2021   3261     466
2022   4369     624
2023    813     116

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT