पुणे: राज्यात शासनाने किमान हमीभाव योजनेतंर्गत हंगाम 2024-25 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद या शेतमालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेत मागील वर्षाच्या तुलनेत शेतकर्यांनी कमी सहभाग नोंदविल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले.
सध्या पुढील हंगामाचे नियोजन सुरू केले असून किती बाजार समित्या त्यामध्ये सहभागी होणार आहेत व तारण योजनेसाठी किती गोदामे उपलब्ध होतील, याचा आढावा घेण्यात येत आहे. (Latest Pune News)
राज्यातील शेतकर्यांच्या शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकर्यांच्या सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पणन मंडळाकडून शेतमाल तारण योजना राबविण्यात येते.
दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर या योजनेमध्ये राज्यातील 306 पैकी 52 बाजार समित्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. या बाजार समित्यांना पणन मंडळामार्फत 21 कोटी 68 लाख रुपयांचे तारण कर्जाचे वाटप केलेले आहे.
राज्यात सोयाबीनची खरेदी सर्वाधिक
केंद्र सरकारच्या सन 2024-25 या हंगामात किमान हमीभाव योजनेअंतर्गत फेब—ुवारी 2025 अखेर नाफेडमार्फत 403 केंद्रांवर 3.62 लाख शेतकर्यांकडून 85 लाख क्विंटल सोयाबीन आणि 632 क्विंटल मुगाची खरेदी केली आहे.
तसेच नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (एनसीसीएफ) 159 केंद्रावर 1.49 लाख शेतकर्यांचा 28.46 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. तसेच 2523 क्विंटल उडीद आणि 5234 क्विंटल मुगाची खरेदी हमी भाव योजनेतंर्गत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.