पुणे

हवेलीत पावसाअभावी भात पिकांचे नुकसान

अमृता चौगुले

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यात कडक उन्हाळी वातावरण असल्याने हवेली तालुक्यातील जवळपास 150 हेक्टर शेती वाया गेली आहे, तर दुसरीकडे लागवड केलेली भात पिकेदेखील जळू लागली आहेत. या अशा दुष्काळाच्या सावटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दुष्काळीस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने पिकांची पाहणी करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत, त्यानुसार सोमवारपासून पिकांची पाहणी केली जाणार आहे. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत सूचना मिळणार आहेत.

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला तरी पावसाने दडी मारली आहे. उलट गेल्या 4-5 दिवसांपासून सिंहगड खडकवासलासह हवेलीच्या पूर्व भागात कडकडीत ऊन पडत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने तालुक्यातील जवळपास 150 हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील जवळपास 100 हेक्टर, तर पश्चिम भागात 50 हेक्टर शेती पडून आहे. या भागात यंदा सरासरीपेक्षा 50 टक्केही पाऊस पडला नाही.

खडकवासला, नांदोशी भागात भात पिकांच्या लागवडी तसेच बाजरी, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या झाल्याच नाहीत, तर लागवड झालेल्या भात व इतर पिकांची सध्याच्या उन्हाळी वातावरणामुळे चिंताजनक स्थिती झाली आहे. खामगाव मावळ, मोगरवाडी, कल्याण, खानापूर, डोणजे, गोर्‍हे, खडकवाडी, मांडवी भागात खाचरे कोरडी ठणठणीत पडल्याने भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे.
भातरोपांची लागवड केल्यापासून पाऊस गायब आहे.

त्यामुळे भातरोपे उपटून टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे, असे खडकवाडी येथील भाजप किसान मोर्चाचे खडकवासला विभागाचे अध्यक्ष नवनाथ तागुंदे यांनी सांगितले, तर ओढे-नाले कोरडे ठणठणीत पडल्याने भात खाचरात पाणी येणे बंद झाले आहे. माळरानातील इतर पिकेदेखील जळू लागली आहेत. तीन-चार दिवसांत पाऊस न पडल्यास सर्व पिके वाया जाणार आहेत, असे मोगरवाडी येथील शेतकरी देविदास बेलुसे यांनी सांगितले.

सरसकट शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी

धरण असूनही धरणाचे पाणी आमच्या शेतीला नाही. पावसावरच बहुतेक शेती आहे. 1972च्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. अशिक्षितपणामुळे निम्म्याहून अधिक शेतकर्‍यांनी पीकविमा काढला नाही. त्यामुळे सरसकट शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मांडवी बुद्रुकचे सरपंच सचिन पायगुडे यांनी केली आहे.

लागवड न झालेल्या शेतीची शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात पुरेशा पावसाअभावी भात, भुईमूग, बाजरी पिके वाया गेल्यास विमा काढलेल्यानाही भरपाई मिळणार आहे.

– मारुती साळे,
तालुका कृषी अधिकारी, हवेली

हेही वाचा

SCROLL FOR NEXT