लोणी-धामणी: आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. या परिसरात कांदा चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने चोरट्यांचा मोर्चा कांद्याकडे वळल्याचे दिसून येत आहे.
लोणी-धामणी परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी विविध वस्तूंच्या चोरीच्या घटना घडत होत्या. आता कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने चोरांनी कांदा चाळी फोडण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा शेतात, कांदा चाळीत तसेच साठवून ठेवला आहे. आता कांद्याचा बाजारभाव वाढला आहे. त्यामुळे कांदा चोरी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. रात्रीच्या वेळी शेत परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
धामणी येथील लोणी-मंचर रस्त्यालगत जाधळ-बढेकर मळ्यात कांदा चाळीत चोरी करण्याच्या उद्देशाने तीन चोरटे टेम्पोमधून आले होते. ही घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री ८.३० वाजता घडली. त्यांना नागरिकांनी वेळीच हटकले. त्यामुळे ते टेम्पो जाग्यावर सोडून पळण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाला नागरिकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर इतर दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले.
प्रतीक जाधव, समीर बढेकर, धनंजय बढेकर, सुरेश बढेकर, अशोक बढेकर व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. एका चोरट्याला अटक केली असून तपास पारगाव कारखाना पोलिस करत आहेत. कांदा चोरीच्या घटना घडत असल्यास संबंधितांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच रात्रीच्या वेळी शेत व कांदा साठवणूक केंद्रांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून केले आहे. तर वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.