बारामती : बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न मानले जाणारे गाव आहे. गावच्या ऐतिहासिक वैभवाचे अनेक पुरावे इथे सापडतात. यामध्ये भर घालणारा यादवकालीन तसेच 18 व्या शतकातील शिलालेख, असे दोन महत्त्वपूर्ण शिलालेख भीमथडी इतिहास संशोधन संस्थेमुळे प्रकाशात आले आहेत.
हे शिलालेख लोणी भापकरमधील सोमेश्वर-महादेव मंदिरात कोरल्याचे भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या विनोद खटके व मनोज कुंभार यांच्या निदर्शनास आले. शिलालेख प्राचीन असल्याने वाचनासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करावी लागल्याची माहिती वाचक अनिल दुधाने व अथर्व पिंगळे यांनी दिली. यासाठी अमोल बनकर, उदयसिंह भापकर यांची विशेष मदत झाली.
गावच्या मध्यवस्तीत असलेल्या प्राचीन सोमेश्वर-महादेव मंदिराच्या मुख्य सभामंडपात रंगशिळेच्या आडव्या तुळईवर मध्यभागी यादवकालीन शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून, तीन ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखावर अनेक वर्ष रंगरंगोटी तसेच वातावरणाचा परिणाम झाला असून, लेखातील काही अक्षरे पूर्णपणे झिजली असून, त्याचा रेखीवपणा कमी झाला आहे, तरी देखील लेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर अथक प्रयत्नाने वाचता येतो. लेखाच्या वरील भागात सूर्य-चंद्र कोरलेले असून, उजव्या बाजूस गाढव व स्त्री यांचा संकर असलेले गधेगळ शिल्प कोरलेले आहे.
या दोन शिलालेखांवरील मजकूर तत्कालीन भाषेत आहे. त्यातील एकाचा रूढ मराठीतील अर्थ
देवळाच्या सजावटीसाठीचे शुल्क म्हणून देवालयाच्या सजावट-व्यवस्थेस एक दाम शुल्क निश्चित केला. तो दाम देवळाची व्यवस्था पाहणाऱ्या मंडळींस द्यावा किंवा त्या व्यवस्थेत सहभागी प्रत्येक गृहस्थाने समरूप द्यावा. जो हे शुल्क देणार नाही, त्याच्या मायेला आणि त्यास ‘गाढव-बाप’ हा दोष लागेल. दुसऱ्या शिलालेखाचा अर्थ त्रिंबक जनार्दन भालेराव यांनी शके 1648 म्हणजेच इसवी सन 1726 रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे लिहिले आहे. हा शिलालेख देवनागरीत असून, भालेराव यांची सोमेश्वराप्रति असलेली भक्ती तसेच त्यांची दानशूरवृत्ती दिसून येते.
शिलालेखाची सुरुवात ही ‘स्वस्ती श्री’ या शुभारंभाचा नेहमीचा प्राकृत/संस्कृत नमस्कारवाचक वाक्यांशाने झाली आहे. देवळाच्या सजावटी (उत्सव, यात्रा किवा दीपोत्सव इत्यादी) साठी 1 दाम शुल्क निश्चित केले आहे. हे शुल्क देवळाची व्यवस्था पाहणाऱ्या मंडळास द्यायचे किंवा व्यवस्थेत सहभागी असलेल्या सर्वांनी समानरित्या द्यायचे. देवळाची देखभाल, सजावट, पूजा, उत्सवांची व्यवस्था, अलंकार, दिवे, देणग्या गोळा करणे इत्यादींसाठी नियमित निधी आवश्यक होता. हे निधी ग्रामस्तरावर औपचारिकरीत्या निश्चित केलेले असत. सजावट, दीपमालिका, पूजा, उत्सव हे ग्रामजीवनाचे केंद्र होते. हे स्थानिक समाजाच्या धार्मिक एकजुटीचे प्रतिबिंब आहे. हा पुरावा दाखवतो की देवस्थाने ही ग््रााम-प्रशासनाची आर्थिक संस्थाही होती. नियमांचे पालन करवून घेणे यातून ग्राम-धार्मिक संस्थेचा व्यवस्थापकीय ढाचा दिसतो. देवळाची व्यवस्था पाहणारे ’मंडळ’ अस्तित्वात असल्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे.