पुणे: स्वातंत्र्यदिन, दहीहंडी उत्सव आणि रविवार, अशा सलग तीन दिवस सुट्या मिळाल्यामुळे सरकारी तथा निमसरकारी, खासगी संस्थांमधील कर्मचार्यांनी पर्यटनाचा बेत आखला आहे. त्यामुळे पुण्यातून बाहेरगावी जाणार्या एसटी, रेल्वेसह विमानांचे बुकिंग फुल्ल झाले. याशिवाय पुणे परिसरातील पर्यटनस्थळी धावणार्या पीएमपीची पर्यटन बससेवाही हाउसफुल्ल झाली आहे.
सलग व विकेंडच्या सुट्यांना पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याचा ट्रेंड अलीकडे रुजू लागला आहे. जोडून सुटी मिळाली की बहुतांश पुणेकर पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. आत्ताही शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या तीन दिवस सलग मिळालेल्या सुट्यांच्या काळात बहुतांश पुणेकरांनी टूरचे नियोजन केले. (Latest Pune News)
त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी व रविवारी पीएमपी, एसटी, रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले होते. पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानक, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी झाली.
एसटी स्थानके, रेल्वे स्टेशन गर्दीने फुलले
एसटीच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले की, पुणे विभागातून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह अन्य ठिकाणी जाणार्या बसगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
स्वारगेट, शिवाजीनगरसह पिंपरीतील वल्लभनगर आगारातून प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता आम्ही लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहेरा म्हणाले की, सलग सुट्यांच्या काळात आमच्याकडील रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले की, प्रवाशांच्या संख्येत नक्कीच वाढ झाली आहे. पुणे विमानतळावरून दररोज 92 विमानांची उड्डाणे आणि 92 विमाने उतरत होती. एकूण 184 विमानांची रोजची ये-जा होते. यात वाढ होऊन संख्या 194 झाली आहे. तसेच, दररोज 32 ते 33 हजारांच्या घरात प्रवासी प्रवास करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्याकडील मनुष्यबळ वाढविले आहे.
पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले की, पुणे आणि परिसरात धावणार्या व पर्यटन विशेष बसचे बुकिंगदेखील फुल्ल झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत.
कुटुंबीयांसह सिंहगडावर पर्यटनाला जाण्याचा बेत आहे. सलग सुट्या मिळाल्यामुळे आनंद घेता येणार असल्याची प्रतिक्रिया कुणाल चव्हाण याने व्यक्त केली.