आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंतीनिमित्त आळंदी (ता. खेड) येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात येणार आहे. हा सोहळा शुक्रवारी (दि. 15) पार पडणार आहे.
सोहळ्याची सुरुवात महाद्वारपूजनाने होणार असून, पूजन दुपारी 2.40 ते 2.55 या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडेल. दुपारी 2.55 ते 3.15 या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलशपूजन होईल. दुपारी 3.15 ते 3.30 या वेळेत तपस्वी वारकर्यांच्या हस्ते कलशारोहण विधिवत पार पडेल. (Latest Pune News)
या वेळी दुभाषिक ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रसंगी सोहळ्यासाठी देणगी देणार्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे. विशेष सहकार्य करणार्यांचा या वेळी स्वतंत्रपणे गौरव करण्यात येणार आहे.
हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या स्मृतीला आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेला अभिवादन करणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या सोहळ्याचे प्रत्यक्ष अथवा लाइव्ह प्रक्षेपणाद्वारे साक्षीदार होण्याचे आवाहन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, अॅड. राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, अॅड. रोहिणी पवार यांनी भाविकांना केले.