पुणे

LokSabha Elections 2024 : महायुतीला खडकवासल्याच्या बालेकिल्ल्यात खिंडार

Laxman Dhenge

[author title="दत्तात्रय नलावडे" image="http://"][/author]

खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात अधिक मतदार संख्या असलेल्या व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठे खिंडार पडले आहे, त्यामुळे भाजपसह महायुतीची चिंता वाढली आहे. खडकवासला विधानसभेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा केवळ 21 हजार 696 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. खडकवासलात मताधिक्य घटल्याने बारामती लोकसभेचे महायुतीच्या विजयाचे गणित चुकले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गेल्या 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांना खडकवासलात विक्रमी 1 लाख 52 हजार 487 मते मिळाली होती तर दोन वेळा खासदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना केवळ 85 हजार 993 मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीत कुल यांना 70 हजारांची आघाडी मिळाल्याने या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट तसेच मनसे असे चार ताकदवान पक्ष एकत्र असल्याने महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असे अंदाज भाजप व मित्रपक्षांनी वर्तवले होते. भाजपने बुथ पातळीपासून कार्यकर्त्यांची एकजूट केली होती. पक्षाचे आमदार भीमराव तापकीर यांनी अक्षरश: शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक, बाजार समिती व इतर संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह शिवसेना शिंदे गट, मनसेचे पदाधिकारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात हिरीरीने उतरले होते. मात्र मोठे नेते, सहकारी संस्थाचे पदाधिकारी नसताही महाविकास आघाडीच्या एकजुटीने निकालात करिष्मा केल्याचे पाहवयास मिळाला. भाजपच्या खडकवासला बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवार यांना केवळ 21 हजार 696 मतांची आघाडी मिळाली. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत खडकवासलाकरांनी सुप्रिया सुळे यांना मोठे मताधिक्य दिले नसले तरी सिंहगड रोड, शिवणे, धायरीसह शहरी भागात सुप्रिया सुळे यांना अपेक्षेपेक्षा चांगले मतदान झाले तर पश्चिम हवेलीच्या ग्रामीण भागात अनेक गावांत आघाडी मिळाली. आमदार भीमराव तापकीर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत अधिक सक्रिय झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खडकवासला अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला.

महायुतीने जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे विकासात आघाडी घेतली आहे. यावर आम्ही प्रचारात भर दिला. मात्र महाविकास आघाडीच्या सहानुभूतीच्या लाटेमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही मताधिक्य घटले. त्यामुळे आगामी काळात तळागाळात जाऊन नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

– भीमराव तापकीर, भाजपचे आमदार

सामान्य मतदारांनी निवडणूक हातात घेतली. अनेक वर्षांनंतर प्रथमच असे चित्र या निवडणुकीत पाहवयास मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळाली आहे.

– काकासाहेब चव्हाण, अध्यक्ष, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

हेही वाचा

SCROLL FOR NEXT