मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दुर्गम आदिवासी भागात मागील लोकसभा निवडणुकीत 50 टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या आदिवासी भागातील दुर्गम आणि डोंगरी गावात मतदार जनजागृती केल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके यांनी दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान सुरू आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 50 टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या गावात विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील गोहे येथे आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने गृहभेटीत मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदानाबाबत जागृती करण्यात आली. शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी मतदार बंधू-भगिनींना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वांनी 13 मे रोजी मतदान करण्याचा संकल्प केला. या वेळी मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
गोहे परिसरातील पाचेवड, पोटकुलेवाडी, सायरखळा, बोरीचीवाडी, पाडळवाडी या वाडी- वस्तीवर घरोघरी जाऊन मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली. पथकाचे प्रमुख सुनील भेके, सदस्य विनायक राऊत, सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे, अभिजित नाटे, मंगेश जावळे उपस्थित होते.
हेही वाचा