पुणे

Loksabha Elections | बिनशर्त पाठिंबा विधानसभेला फळाला येईल? मनसैनिक विवंचनेत

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही युती कायम राहणार का आणि राहिल्यास पुण्यात किमान एकतरी जागा मनसेला मिळणार का ? असा प्रश्न आता मनसैनिकांनाच पडला आहे. शहरातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार असल्याने मनसेला उर्वरित एक जागा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अखेर लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न घेता मनसेने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. याउलट या निवडणुकीत मनसेच्या हाती काहीच लागणार नाही. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच मनसे कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात अधिकाधिक जागा आपल्याला मिळतील, अशी आशा आता मनसे कार्यकर्त्यांना लागली आहे. पुण्यात मात्र मनसे इच्छुकांना संघर्षच करावा लागेल असेच चित्र आहे.

पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. त्यात कसबा मतदारसंघ वगळता उर्वरित वडगावशेरी व हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, हे दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आहेत. तर उर्वरित पाच जागेवर भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा या निकषानुसार सात जागांवर मनसेला उमेदवारीसाठी दावा करणेच अवघड जाणार आहे. तर कसबा विधानसभेचा एकमेव पर्याय मनसेच्या हातात असू शकणार आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार थेट चौथ्या क्रमाकांवर होता, त्यामुळे भाजपसुद्धा ही जागा सहजासहजी सोडणार नाही, हेसुुद्धा स्पष्ट आहे.

2019 च्या विधानसभेतील मनसेचे चित्र

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आठपैकी पाच मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये कोथरूडमध्ये मनसेला दुसर्‍या क्रमाकांची मते मिळाली होती, तर हडपसरमध्ये तिसर्‍या, शिवाजीनगर व कसबा पेठमध्ये चौथ्या आणि पुणे कॅन्टोन्मेंट पाचव्या क्रमाकांवर मनसेचे उमेदवार होते. कोथरूडमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न करता मनसेला पाठिंबा दिला होता. तर वडगावशेरी, पर्वती आणि खडकवासलामध्ये मनसेने आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, ज्या जागांवर मनसेने उमेदवार उभे केले होते, त्यांना मिळालेली मते लक्षात घेता एकाही जागेवर मनसेला ठामपणे जागा सोडण्याबाबत दावा करता येऊ शकणार नाही, अशीच अवस्था आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. हा बिनशर्त पाठिंबा पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आहे. त्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिकांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या वेळी विधानसभेला स्वतंत्र लढायचे का युती करायची याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील.

– योगेश खैरे, मनसे प्रवक्ते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT