पुणे

loksabha election : सेक्टर अधिकार्‍यांना मतदान कसे करावे याचे प्रशिक्षण

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सेक्टर अधिकार्‍यांना मतदान केंद्राची तयारी, मतदान प्रक्रिया, मतदान पूर्ण झाल्यानंतरचे कामकाज आदी संदर्भातील प्रशिक्षण मंगळवारी (दि. 2) देण्यात आले. हे प्रशिक्षण थेरगाव येथील स्व. शंकरअण्णा गावडे कामगार भवन येथे झाले. या वेळी मावळ लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, चिंचवड मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी 48 सेक्टर अधिकारी, 48 सहायक आणि 5 राखीव सेक्टर अधिकारी उपस्थित होते. यातील 5 सेक्टर अधिकार्‍यांना जिल्हास्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय मतदान यंत्राच्या हाताळणीचे देखील प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. सेक्टर अधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरंसन केले. मतदान केंद्रावरील संपूर्ण तयारी, मतदानापूर्वीची तयारी, मतदानावेळीची तयारी आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची तयारी याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली. मतदान साहित्य ताब्यात घेणे आणि जमा करणे, याबाबतची देखील माहिती देण्यात आली.

मतदान केंद्राची स्थिती आणि त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड आणि उपअभियंता प्रकाश कातोरे यांनी दिले. मतदान यंत्र सीलिंग आणि कमिशनिंगबाबत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींकडून मतदान यंत्र हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी 40 मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. सेक्टर अधिकार्‍यांचे समन्वय अधिकारी अजिंक्य येळे यांनीही मार्गदर्शन केले.

वृद्व, दिव्यांग, महिलांचे मतदान त्वरेने घ्या

आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वृद्ध, दिव्यांग, महिला यांचे मतदान त्वरेने होईल, याची दक्षता संबंधित सेक्टर अधिकार्‍यांनी घ्यावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT